पिंपरी-चिंचवड | देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया मानल्या जाणाऱ्या जनगणना २०२७ प्रक्रियेची पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसह शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांना या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या जनगणनेत अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह माहिती संकलनावर विशेष भर देण्यात आला असून, स्वयं-नोंदणी (Self Enumeration) या सुविधेला प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांना १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत se.census.gov.in संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. ही प्रक्रिया सोपी, जलद आणि सुरक्षित असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यानंतर १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील. या वेळी नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले की, “जनगणना ही शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचीप्रक्रिया आहे. स्वयं–नोंदणीमुळे नागरिकांचा वेळ वाचतो आणि माहिती अधिक अचूकपणे नोंदवता येते. त्यामुळे प्रत्येकाने या सुविधेचालाभ घ्यावा.”
महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, “आपली जनगणना, आपला विकास या संकल्पनेतून प्रत्येकनागरिकाने पुढाकार घेत सहभाग नोंदवावा. अचूक माहितीमुळे शहराच्या विकासाचे नियोजन अधिक प्रभावी होईल.”
आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही नागरिकांना जबाबदारीने सहभागी होण्याचे आवाहन करत, “जनगणनेतील माहिती ही शहराच्या भविष्यातील नियोजनाचा आधार असते,” असे सांगितले.
तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी स्पष्ट केले की, “स्वयं–नोंदणी प्रक्रिया सुरक्षित आणि सुलभ आहे. नागरिकांनीऑनलाइन पद्धतीने माहिती भरून प्रशासनाला सहकार्य करावे.”


