जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन अशी ओळख असणाऱ्या ‘गुगल’चा आज (27 सप्टेंबर) 25 वा वाढदिवस आहे. गुगलने दर वर्षीप्रमाणे याही वर्षी डूडलच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा करत आहे.
या डूडलवर क्लिक केल्यानंतर यूजर्स एका नव्या पेजवर जातात, जिथे गुगलच्या 25व्या वाढदिवसानिमित्त माहिती मिळते. सोबतच संपूर्ण स्क्रीनवर रंगीबेरंगी कन्फेटी (रंगीत कागदांचे तुकडे) उधळली जाते.
इंटरनेटवर काहीही सर्च करायचं असल्यास आपल्याला सर्च इंजिनची मदत घ्यावी लागते. गुगल व्यतिरिक्त इतरही सर्च इंजिन अस्तित्वात आहेत. मात्र, गुगल एवढं लोकप्रिय झालं आहे, की आजकाल एखादी गोष्ट शोधायची असल्यास ‘सर्च करा’ म्हणण्याऐवजी आपण ‘गुगल करा’ असंच म्हणतो. यातूनच गुगलचा सामान्यांवर पडलेला प्रभाव आपल्याला दिसून येतो.
कोणी केली स्थापना?
सर्जे ब्रिन आणि लॅरी पेज हे दोघे स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कम्प्युटर सायन्सची पदवी घेत होते. इंटरनेट – म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब बाबत दोघांचंही व्हिजन सारखंच असल्यामुळे त्यांनी एकत्र एक सर्च इंजिन तयार करण्यास सुरुवात केली. 27 सप्टेंबर 1998 साली गुगल इनकॉर्पोरेटेडची अधिकृत स्थापना करण्यात आली. पेज यांनी सुरुवातीला या कंपनीचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलं होतं. मात्र, नंतर ते बदलून ‘गुगल’ करण्यात आलं.
‘गुगल’चा अर्थ काय?
गुगल हा शब्द खरंतर ‘Googol’ या शब्दाचं बदललेलं रुप आहे. एकावर शंभर शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होते, तिला गुगोल म्हणतात. यापासूनच गुगलचं नाव घेण्यात आलं आहे.