केंद्र शासनाच्या निर्णयानुसार विशेष तज्ञ समिती गठीत..
नागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्प शहराच्या दृष्टीने माईलस्टोन ठरेल असे प्रतिपादन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्पाचे काम मे. मॅट्रीक्स सिक्युरिटी अँड सर्व्हेलन्स प्रायव्हेट लिमीटेड यांना देण्यात आले असून या कंपनीच्या अधिका-यांसमवेत आज प्रारंभिक बैठक आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत प्रकल्प अंमलबजावणीबाबत विविध सूचना आणि निर्देश आयुक्त पाटील यांनी दिले, त्यावेळी ते बोलत होते.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संदेश चव्हाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, दुरसंचार व अणुविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस न-होना, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, माणिक चव्हाण, संजय खाबडे, प्रविण घोडे, बाबासाहेब गलबले, शशिकांत मोरे, दिलीप धुमाळ यांच्यासह मे. मॅट्रीक्स सिक्युरिटी अँड सर्व्हेलन्स प्रायव्हेट लिमीटेडचे अध्यक्ष एन. संदिप राजू, संचालक जे. डेव्हीड, उपाध्यक्ष आदित्य तसेच कंपनीचे अधिकारी आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
प्रकल्पाचे काम निश्चित केलेल्या तांत्रिक परिमाणानुसार कालबध्द पध्दतीने पूर्ण करणे गरजेचे असून या कामाची गुणवत्ता आणि दर्जा उत्तम राखावा असे निर्देश आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी दिले. शहरांतर्गत सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्पाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करावे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आयुक्त पाटील म्हणाले.
संगणकीय सादरीकरणाद्वारे दुरसंचार व अणुविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस न-होना यांनी प्रकल्पाची माहिती दिली. महापालिकेच्या वतीने नागरी सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहराचे वाढते नागरीकरण विचारात घेता सुरक्षा यंत्रणा सुयोग्य पध्दतीने ठेवण्यासाठी शहराच्या महत्वाच्या भागात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. ही सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा अत्याधुनिक उच्च दर्जाची असून अशा प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याच्या वतीने तसेच महापालिकेमार्फत आणि स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे ४ हजार ५९० सीसीटीव्ही कॅमेरे सध्या शहरात कार्यान्वित आहेत. सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्पाकरीता सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय रक्कम महापालिका सभेने मंजूर केली होती. या प्रकल्प उभारणीचे काम विशिष्ट स्वरुपाचे आणि तांत्रिकदृष्टया गुंतागुंतीचे असल्याने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुभवी सल्लागार नेमण्यात आले आहेत.
या प्रकल्पाकरीता केंद्र शासनाच्या निर्णयानुसार विशेष तज्ञ समितीदेखील गठीत करण्यात आली असून यामध्ये महापालिका आयुक्त राजेश पाटील, शहर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संदेश चव्हाण, कार्यकारी अभियंता थॉमस न-होना, पोलीस उपायुक्त मयांक इप्पर, आनंद भोईटे, बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे, व्यवस्थापक शशांक भालेराव, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर पाटील, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे मुख्य लेखाधिकारी सुनिल भोसले, पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. सुधीर आगाशे यांचा समावेश आहे. सीसाटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा उभारण्यासाठी नागरिक, पोलीस, लोकप्रतिनिधी तसेच एनजीओ यांनी मागणी नोंदविली. त्यावर पोलीस प्रशासन आणि महापालिका अभियंते यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन प्राधान्य यादी तयार केली आहे, अशी माहिती दुरसंचार व अणुविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस न-होना यांनी दिली.