ओदिशा रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने आज मोठी कारवाई करत तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली.
ओदिशा येथील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी (Odisha Railway Accident) सीबीआयने आज मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीबीआयने अटक केलेल्या आरोपींमध्ये सीनियर सेक्शन इंजिनिअर अरुण कुमार महांतो, सीनियर सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार यांचा समावेश आहे.
आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 304 आणि कलम 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मागील महिन्यात 2 जून रोजी, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोरोमंडल एक्स्प्रेसने एका मालगाडीला धडक दिली होती. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डब्बे बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसला आदळले. या भीषण अपघातात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, एक हजारांहून अधिक प्रवासी जखमी झाले होते. या भीषण रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या अपघाताची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयने तपास हाती घेतला. सीबीआयच्या चौकशी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली होती.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालात काय म्हटलं?
काही दिवसांपूर्वीच रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी (CRS) ओदिशातील रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे बोर्डाला स्वतंत्र चौकशी अहवाल सादर केला. या अहवालानुसार, “सिग्नलिंगच्या कामात कमतरता असल्यामुळे, अपघाताच्या ठिकाणी असलेल्या बहंगा बाजार येथील स्टेशन व्यवस्थापकाने S&T कर्मचाऱ्यांना दोन समांतर ट्रॅकमधील त्रुटींबाबत सूचना दिली असती, तर ते उपायात्मक पावले उचलू शकले असते. बहनगा बाजार स्थानकावरील लेव्हल क्रॉसिंग गेट 94 वरील ‘इलेक्ट्रिक लिफ्टिंग बॅरियर’ बदलण्याच्या कामासाठी स्टेशन-विशिष्ट मंजूर सर्किट सर्किट आरेख न पुरवणे हे चुकीचे पाऊल होते, ज्यामुळे चुकीची वायरिंग झाली.”
टया अपघाताचं मुख्य कारण चुकीचा सिग्नल होता.’ समितीने म्हटलं आहे की, सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T) विभागाकडून अनेक पातळीवर चुका झाल्या होत्या. आधीच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं असतं तर ही दुर्घटना टाळता आली असती, असंही उच्चस्तरीय समितीने म्हटलं असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.