केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आयोगाने निर्देशित केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन उमेदवार आणि राजकीय पक्षांनी करावे, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिल्या.
मंत्रालय येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत 18 व्या लोकसभा निवडणुक कार्यक्रमाबाबत बैठक घेतली. बैठकीस सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.
यावेळी श्री.चोक्कलिंगम यांनी 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील मतदानाचे वेळापत्रक, निवडणुकीसाठी यंत्रणांची तयारी याविषयीची माहिती दिली. त्याचसोबत उमेदवारांसाठीची नियमावली, निवडणूक प्रक्रिया, नामांकन प्रक्रिया, खर्च या विषयीचे नियम आणि प्रक्रिये बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले.
राजकीय पक्षांनी नियमांचे काटेकोर पालन करत उमेदवारी प्रक्रिया अचूक पार पाडावी, असे आवाहनही एस. चोक्कलिंगम यांनी केले. बैठकीस विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.