२० डिसेंबर (फोटो एस फुलसुंदर )
CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन पेटलं आहे. सुरुवातीला आसाम आणि दिल्ली या ठिकाणी झालेल्या आंदोलनाचं लोण देशभर पसरलं आहे. यात महाराष्ट्रातल्या मुबई, पुणे,औरंगाबाद, हिंगोली, बीड, परभणी या शहरांचा समावेश आहे.
आज पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटनांनी सुध्दा या विधेयकाच्या विरोधात आज पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. ‘एनआरसी, सीएए गो बॅक, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी’, भारतीय संविधान झिंदाबाद,अशा घोषणा देण्यात आल्या.हाताला काळ्याफिती बांधून निदर्शनं करण्यात आले. यावेळी सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.
हे विधेयक राज्यघटनेच्या ,कलम १४ व १५ उल्लंघन असा आक्षेप एमआयएमने घेतला आहे. केंद्र सरकार भविष्यात राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी) देखील आणणार आहे. दोन्ही गोष्टी एका विशिष्ट समाजाच्या व भारतीय संविधानाच्या विरोधात असून एका विशिष्ट समाजाला त्रास देण्यासाठी जाणीव पूर्वक हा कायदा बनवण्यात आला असल्याचा आरोप पिंपरीतील एमआयएमने केला आहे.या आंदोलनात काँग्रेस,एमआयएम आणि मुस्लिम समाजातील विविध संघटनांनी सहभाग घेतला होता.
दुपारी दोन च्या सुमारास सुरू झालेला मोर्चा शांततेत चार वाजता संपला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांना मुस्लिम बांधवांनी गुलाबाचे फुल देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि मुख्य चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. २ डी.सी.पी, ४ ए.सी.पी, २५ पोलीस निरीक्षक, ३५० पोलीस कर्मचारी एस.आर.एफ च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. सोशीयल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या आंदोलना वेळी सर्व आंदोलकांना पाण्याच्या बाटल्याचे वाटप करण्यात येत होते, पोलिसांना हि पाणी देत होते, आदोंलक व पोलीस यामध्ये चांगला समन्वय दिसून आला या वेळी कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. आंदोलन संपल्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आंदोलकांनी एका जाग्यावर जमा करून परिसर स्वच्छ केला , शांततेत आंदोलन पार पडले.