Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीसी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल , राष्ट्रपतींकडून घोषणा

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल , राष्ट्रपतींकडून घोषणा

झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल बनणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राधाकृष्णन हे आता रमेश बैस यांची जागा घेतील. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली होती. आता सी. पी. राधाकृष्णन यांची या पदावर नेमणूक झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, झारखंडमध्ये सी. पी. राधाकृष्णन यांच्या जागी भाजपाचे वरिष्ठ नेते संतोष कुमार गंगवार यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री अनेक राज्यांमधील राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली.

कोण आहेत सी. पी. राधाकृष्णन?

काही महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी राज्याला नवे राज्यपाल दिले आहेत. राधाकृष्णन हे अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. ते दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, देशात मोदींची लाट असतानाही ते पराभूत झाले होते. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपतींनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

अनेक राज्यांना मिळाले नवे राज्यपाल

सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसाम आणि मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिष्णू देव वर्मा हे तेलंगणाचे राज्यपाल असतील. प्रकाश माथूर यांच्याकडे सिक्कीमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुलाब चंद कटारिया यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर रमेन डेका यांच्याकडे छत्तीसगड राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सी. एच. विजयशंकर मेघालयचे राज्यपाल असतील, तर के. कैलाशनाथ पुद्दुच्चेरीचे उपराज्यपाल असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments