डी.बी. पथकाची कारवाई; ५७.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
पिंपरी-चिंचवड : तळवडे परिसरात घरात एकट्या असलेल्या ६० वर्षीय महिलेचे हातपाय बांधून, तोंडावर साडी टाकून मारहाण करत चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना चिखली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या आठ तासांत अटक केली. या आरोपींनी महिलेच्या घरातून ७३ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य मौल्यवान वस्तू असा एकूण ५३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि हत्यारे असा अंदाजे ५७ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री एक ते सव्वा एकच्या सुमारास ज्योतीबानगर, तळवडे येथे राहणाऱ्या भारती मारुती भालेकर (वय ६०) या घरात झोपलेल्या असताना तीन अनोळखी व्यक्तींनी हॉलचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी महिलेचे हातपाय बांधले, तोंडावर साडी टाकून त्यांना मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवून घरातील मौल्यवान वस्तू लुटल्या. यामध्ये ४८ लाख २५ हजार रुपये किमतीचे ६८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, पाच लाख रुपये रोख, ३० हजार रुपयांचे चांदीचे तीन जोड पैंजण, दहा हजार रुपयांचा मोबाइल आणि पाच हजार रुपयांची लेडीज घड्याळ अशा वस्तूंचा समावेश होता.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३११, ३३१(४) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरातील ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.
या कारवाईत अनारुल्ला मजहरुल्ला चौधरी (वय ३६, रा. सेक्टर १६, बालघरेनगर, सरस्वती स्कूलजवळ, चिखली), अब्दुल रहीम मजीद मोमीन (वय ३९, रा. इस्लाम कंपाउंड, चारकोप, कांदिवली, मुंबई) आणि समिउल्ला अजमतुल्ला खान (वय ३२, रा. शिलफाटा, आचार गल्ली, मुंबई) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक आरोपींकडून अंदाजे ५७ लाख ८७ हजार ४०० रुपये किमतीचे ७३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे तीन जोड पैंजण, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव, पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, चिखली पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


