काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे मांडू, असे विधान केले होते. तसेच महिला सशक्तीकरणाबाबत बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख पंतप्रधान असा केला होता. त्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. दरम्यान, यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केलं.
काय म्हणाले अजित पवार?
“अनुभव नसला की मी-मी म्हणणारे चुकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पंतप्रधान म्हटले होते. तर, राज्य लोकसेवा आयोग (एमपीएसीचा) प्रश्न निवडणूक आयोगाकडे मांडू असही त्यांनी म्हटलं होतं. ते आता अनुभवातून शिकतील. मात्र, जोपर्यंत शिकतील तोपर्यंत त्यांचे मुख्यमंत्री पद जाईल”, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीबाबतही केलं भाष्य
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबतही भाष्य केलं. “एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आमच्या कानावर सातत्याने काही गोष्टी येत होत्या. महाविकास आघाडीचे सरकार आल्याच्या पहिल्या दिवसापासून हे सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना ठाण्यातील अधिकारी नेमण्याचे सर्वाधिकार दिले होते. बंडखोरीच्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी आमदार जिथे असतील. तेथून त्यांना ‘मातोश्री’वर आणण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पण, अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्यासोबत निष्ठा ठेवत त्यांच्यासह आमदारांना सुरळीतपणे मुंबईबाहेर जाऊ दिले”, अस ते म्हणाले.
“…तर वेगळे चित्र पहायला मिळेल”
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीबाबतही प्रतिक्रिया दिली. “सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याकरिता विरोधकांची मते एकत्रित राहिली पाहिजेत. मतांची विभागणी होता कामा नये. मतांची विभागणी न झाल्यास काय होते हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दिसले. त्यामुळे विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये समन्वय ठेवून महाविकास आघाडीने जागावाटप केले. तर, वेगळे चित्र पहायला मिळेल. यापुढील काळात आघाड्यांचेच सरकार चालेल. आता कोणत्याही एका पक्षाचे सरकार येण्याची शक्यता कमी आहे”, असेही ते म्हणाले.