सप्तश्रृंगी गडावरील घाट मार्गावर बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस दरीत कोसळली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू तर १५ जाण जखमी झाले आहेत.
सप्तश्रृंगी गडावरील घाट मार्गावर बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस दरीत कोसळली. स्थानिकांनी धाव घेत मदत कार्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत १६ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत.
राज्य परिवहन महामंडळाची बुलढाणा येथील खामगाव आगाराची बस मंगळवारी सप्तश्रृंगी गडावर रात्री उशिराने आली. बुधवारी सकाळी परतीच्या प्रवासाला लागली. घाट मार्गावरील गणपती वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बस दरीत कोसळली. बसमध्ये साधारणत: ३२ प्रवासी होते. त्यातील १५ जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने अद्याप मदत कार्य सुरू असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी दिली.
जखमींवर तातडीने उपचाराची पालकमंत्र्यांची सूचना
सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघातात १८ प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.
अपघातग्रस्त बस ही खामगाव डेपोची आहे. त्यात १८ प्रवासी प्रवास करीत होते. गड उतरत असताना गणपती पॉइंट वळणावर हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी दक्षता घेण्याची सूचना भुसे यांनी केली आहे.