फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रियापाठोपाठ आता स्वित्झर्लंडमध्येही ‘बुरखा बंदी’ निर्णय घेण्यात आला आहे. स्वित्झर्लंडमध्ये एका जनमत चाचणीनंतर सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वाजनिक ठिकाणी वावरताना मुस्लीम महिलांना हिजाब आणि बुरखा घालून आपला चेहरा लपवता येणार नाही. स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये ५१ टक्के नागरिकांनी बुरखा आणि हिजाब सार्वजनिक ठिकाणी घालू नये या बाजूने मत दिलं आहे.
मात्र स्वित्झर्लंडच्या संसदेने आणि देशातील सरकारने तयार केलेल्या सात सदस्यांचा सहभाग असणाऱ्या कार्यकारी परिषदेने या जनमत चाचणीमधील मतदानाला विरोध करत बंदीचा निर्णय अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे. स्वित्झर्लंडमधील नवीन प्रस्तावामध्ये धार्मिक स्थळांवर जाताना महिलांना सर्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्याची तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच मास्क घालण्याची मूभा देण्यात आली आहे. मात्र पर्यटक म्हणून आलेल्या माहिलांपासून स्थानिक मुस्लीम महिलांनाही इतर कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकून फिरण्याची परवानगी यापुढे नसेल.
सीएनएनने दिलेल्या वृत्तातनुसार, या जनमत चाचणीला स्वित्झर्लंडमधील सर्व धार्मिक गटांचे नेतृत्व करणाऱ्या संस्थेनेही विरोध केला आहे. मानवी हक्कांमध्ये धार्मिक हक्कांचाही समावेश असतो आणि धार्मिक हक्कांमध्ये कपड्यांची निवड करण्याचा अधिकार देण्यात आला आहे असं या जनमत चाचणीला विरोध करणारे म्हणत आहेत.