२७ जानेवारी २०२१,
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलिसांनी बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १३ बुलेट आणि दोन महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकींची किंमत जवळपास २० लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. अनलॉक कालावधीत अनेकांनी चोरीचा मार्ग अवलंबला. या घटना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने वाहन चोरीच्या घटनांची माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अमोल ढोबळे हा बुलेट चोरी करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. अमोलने चोरलेली बुलेट विकण्यासाठी त्याचे दोन साथीदार मोशी टोलनाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी मोशी टोलनाक्यावर सापळा रचला.
पोलिसांनी संशयावरून आरोपी विशाल मगर (वय २०, अहमदनगर) आणि विशाल खैरे (अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक चोरीची बुलेट होती. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पिंपरी-चिंचवड, पुणे, नवी मुंबई, ठाणे परिसरातून चोरलेल्या १३ बुलेट आणि दोन महागड्या दुचाकी अशा १५ दुचाकी जप्त केल्या. बुलेट चोर अमोल ढोबळे याचा पोलीस शोध घेत आहेत.