तेजसला पहिल्याच टप्यात नोकरीची संधी मिळाली. तो शुक्रवारी वर्ध्यातून कामावर जॉईन होण्यासाठी पुण्याकडे निघाला होता. मात्र वाटतेच त्याच्यावर काळाने घाला घातला आहे.
नागपूर-पुणे एसी स्लीपर कोच बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्यामुळे २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात वर्ध्याच्या तेजसचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी समजल्यानंतर तेजसच्या आईचा अक्षरशः काळीज चिरणारा आक्रोश पाहायला मिळाला.
बुलढाणा अपघातात वर्ध्याच्या तेजस पोकळेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारपासून तो पुण्यातील एका कंपनीत रुजू होणार होता. त्यासाठी तो वर्ध्याहून पुण्याच्या दिशेने निघाला होता, मात्र वाटेतच काळ आडवा आला.
कोण होता तेजस पोकळे?
वर्धा शहरातील कृष्ण नगर येथील तेजस पोकळे या युवकाचा मृतांमध्ये समावेश आहे. तेजस पोकळे हा लहानपणापासून शिक्षणात हुशार होता. त्याने नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. तेजसला पहिल्याच टप्यात नोकरीची संधी मिळाली. तो शुक्रवारी वर्ध्यातून कामावर जॉईन होण्यासाठी पुण्याकडे निघाला होता. मात्र वाटतेच त्याच्यावर काळाने घाला घातला आहे.
बारावीपर्यंत वर्धेत शिक्षण घेणाऱ्या कृष्णनगर येथील तेजस रामदास पोकळे याने आपल्या कर्तृत्त्वाच्या जाेरावर औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविला. याच ठिकाणी कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षाचे धडे घेत असताना त्याने महाविद्यालयीन कॅम्पसला पुढे जात मुलाखत दिली. याच मुलाखतीत त्याची बड्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नोकरीसाठी सिलेक्शन केले. ही वार्ता कुटुंबियांना दिल्यावर तेजस वर्धेला परतला. कुटुंबियांसोबत काही दिवस घालवल्यावर तो शुक्रवारी पुणे येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सने रवाना झाला.
रामदास पोकळे हे तेजसचे वडील. रामदास हे हातमजुरी करून फर्निचर तयार करायचे. घरची परिस्थिती हालखीची असताना रामदास यांनी आपल्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं. मुलगा लहानपणापासूनच हुशार होता. त्याला दहावी आणि बारावीत गणितात १०० पैकी १०० गुण मिळाले होते. वडिलांनी मेहनत करून शिक्षण दिल्यानंतर पोरानेही त्यांच्या कष्टाचं चीज करत चांगली नोकरी मिळवली होती. परंतु एका अपघाताने पोकळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
तेजस पोकळे हा राहत असलेल्या परिसरात सर्वांकडूनच त्याच्या गुणवत्तेची प्रशंसा होत असे. मात्र आता त्याच्या अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
‘अत्यंत असंवेदनशील सरकार. देवेंद्र जी एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना? राजकीय उखाळ्या पाखाळ्या कमी करा. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या’ असे ट्वीट संजय राऊत यांनी आक्रोश करणाऱ्या माऊलीचा व्हिडिओ शेअर करत केले आहे.