Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रआकुर्डीत वारकरी भवन उभारा; शंकर जगतापांच्या नेतृत्वाखालील वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी

आकुर्डीत वारकरी भवन उभारा; शंकर जगतापांच्या नेतृत्वाखालील वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी

संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनाला यंदा ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आकुर्डी येथील मुक्कामाला ३०० हून अधिक वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेने आकुर्डी येथे वारकरी भवन उभारावे. त्याचप्रमाणे दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी मेट्रोच्या खांबावर संतांचे तैलचित्र, त्यांचे अभंग व वारकरी संप्रदायांशी संबंधित बाबींवर म्युरल्स उभारण्याची सूचना महापालिकेला केली होती. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, अशा मागण्या पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळाने आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळाने आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. आयुक्तांनी त्यांच्या दालनात बैठक घेऊन या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी शंकर जगताप, माजी उपमहापौर शैलजा मोरे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे इनामदार, संत तुकाराम संस्थान कमिटी अध्यक्ष पुरूषोत्तम मोरे इनामदार, विश्वस्त विशाल महाराज मोरे इनामदार, भंडारा डोंगर समिती अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील, महाराष्ट्र वारकरी महामंडळ सचिव व माजी नगरसेवक आप्पा बागल, खंडोबा ट्रस्ट निगडीचे अध्यक्ष तानाजी काटमोर, कासारवाडी दत्त मंदिर संस्थापक शिवानंद स्वामी, हभप जयवंत देवकर, हभप किशोर पाटील, हभप मारूती पवार, राज कड महाराज, बापू सोमवंशी (विणेकरी), जंगली महाराज काळभोर, प्रकाश जवळकर, आदेश नवले, सतपाल ढोरे, रविंद्र जाधव, राम बोडके, सुप्रिया सोळांकुरे आदी उपस्थित होते.

शेकडो वर्षापूर्वी दळणवळणाची, संवादाची साधने नसलेल्या काळापासून सुरू झालेली वारीची भक्ती परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या देहू आणि आळंदी येथून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून शेतकरी, कष्टकरी, सधन, निर्धन दरवर्षी पंढरपूरची वाट चालत असतात. ही वारी म्हणजे वारकऱ्यांचेच नाहीतर सग्यासोयऱ्यांचे, आप्तजनांचे जीवन सात्विक आनंदाने ओतप्रोत भरून टाकणारी असते. अगदी रणरणत्या उन्हात, धुवांधार पावसात, वादळवाऱ्यात आजतागायत अखंड ही वारी चालू आहे. वारीच्या अखंड भक्ती परंपरेत संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनाला यंदा ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच वारीत पंढरीच्या ओढीने जाणाऱ्या संत तुकाराम मराहाज पालखी सोहळ्याच्या पिंपरी-चिंचडमधील पहिल्या मुक्कामालाही ३०० वर्षाहून अधिक वर्षे पूर्ण होत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा दरवर्षी मुक्काम असतो. पालखी मुक्कामाच्या दिवशी शहरातील नागरिक विठ्ठलाचा अखंडपणे गजर करत राहतात. हा गजर ३०० वर्षांहून अधिक काळ सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या. आकुर्डी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी भवन उभारून वारकऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी, शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्याचा वेध घेऊन वारीची परंपरा अखंड सुरू राहावी यासाठी पालखी तळासाठी मोठे मैदान आरक्षित करावे अशा मागण्या वारकऱ्यांनी आयुक्तांकडे केल्या.

तसेच दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी मेट्रोच्या खांबावर संतांचे तैलचित्र, त्यांचे अभंग व वारकरी संप्रदायांशी संबंधित बाबींचे म्युरल्स उभारण्याबाबत महापालिका प्रशासनाला सूचना केली होती याची भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांना आठवण करून दिली. त्यांनी केलेल्या सूचनेची अंमलबजावणी झाल्यास शहरातील नागरिकांना दररोज वारीचा अनुभव घेता येईल आणि भक्तिभावाचे वातावरण राहिल, असे शंकर जगताप यांनी आयुक्तांना सांगितले. तसेच महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव व माजी नगरसेवक आप्पा बागल यांनी महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी किर्तन महोत्सवाचे आयोजन करावे, अशी सूचना आयुक्त शेखर सिंह यांना केली. त्यानंतर शिष्टमंडळाने आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले. आयुक्तांनी शिष्टमंडळाच्या मागण्या सविस्तर ऐकून घेत त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे, असे शंकर जगताप यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments