ओडिशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे लग्नात एका नववधूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाठवणीवेळी ही नवरी इतकी रडली की तिला हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच तिचा मृत्यू झाला.
ओडिशाच्या सोनेपूर जिल्ह्यातील ही घटना असून गुप्तेश्वरी साहू उर्फ रोझी असं मृत नवरीचं नाव आहे. शुक्रवारी बालानगीर इथे राहणाऱ्या बिसीकेसन याच्यासोबत रोझीचं लग्न झालं. लग्नानंतर पाठवणीची वेळी रोझीला रडू अनावर झालं. यावेळी ती इतकी रडली की रडत रडत असतानाच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. नातेवाईकांनी तीला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती उठली नाही. इंडिया टुडेने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
त्यामुळे तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. शवविच्छेदनानंतर तरुणीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. इंडिया टुडेसोबत बोलताना गावातील एका व्यक्तीने सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच रोझीच्या वडिलांचं निधन झालं होतं, त्यामुळे ती तणावात होती. तिच्या काही नातलगांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं. पण, अवेळी मृत्यूने तीला कवटाळले.