राज्यसेवा परीक्षेच्या केवळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे राज्यभरातील परीक्षार्थी रस्त्यावर येऊन आक्रोश व्यक्त करत होते. विद्यार्थ्यांचा वाढता विरोध पाहून अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता २१ मार्चला होणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यभरातील परीक्षार्थींना यामुळे दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाच्या आपत्ती निवारण आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्णयानुसार १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे ‘एमपीएससी’ने गुरुवारी जाहीर केल्यानंतर पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. विरोधकांनीही एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उचलून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी १२ मार्चला रात्रीच समाजमाध्यमांद्वारे संवाद साधून परीक्षेची आठ दिवसांतील नवी तारीख जाहीर करण्याच्या सूचना आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार आयोगाने २१ मार्चला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले.
१४ मार्चला नियोजित परीक्षेकरिता आयोगाने वितरित केलेल्या प्रवेश प्रमाणपत्राच्याच आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. तसेच २७ मार्चला महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा २०२० आणि ११ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० या दोन परीक्षा नियोजित तारखांनाच घेतल्या जाणार असून त्यात कोणताही बदल होणार नाही.