दिल्लीवरून देहरादूनच्या दिशेने निघालेल्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आज बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. गाडी धावत असतानाच इंजिनपासून आठव्या बोगीतआगीचा भडका उडाला. काही वेळातच बोगीमध्ये झपाट्याने आग पसरली. मात्र, घटनेची माहिती मिळताच इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवण्यात आली. यानंतर तातडीने बोगीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं.
देहरादूनला जात असलेल्या एक्स्प्रेस गाडी रायवाला कानसरो दरम्यान असताना सी ४ बोगीमध्ये आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बोगीला आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखत गाडी तातडीने थांबवण्यात आली. त्यानंतर बोगीतून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. बोगीतून ३५ जण प्रवास करत होते. त्यानंतर आग लागलेली बोगी तातडीने वेगळी करण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं.