२४ डिसेंबर २०२०,
सर्वसामान्यांना आणि छोटय़ा व्यावसायिकांना भरीस पाडून झटपट आणि विनासायास कर्ज वितरित करण्याची आवतने देणाऱ्या अनधिकृत डिजिटल वित्तपुरवठा व्यासपीठे तसेच मोबाइल उपयोजनांबाबत (अॅप्स) सावधगिरी बाळगली जावी, असा इशारा रिझव्र्ह बँकेने बुधवारी दिला.
रिझव्र्ह बँकेने प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, अशा भामटय़ा तंत्रस्नेही कर्जदात्या संस्थांचा सुळसुळाट झाला असल्याची कबुली देणारा अहवालच तयार केला आहे. अशा कोणत्याही अज्ञात व्यक्ती अथवा अनधिकृत अॅप्स अथवा डिजिटल पोर्टलवर आपले ‘केवायसी’ दस्तऐवजांच्या प्रती देऊ नयेत, असेही मध्यवर्ती बँकेने बजावले आहे. अशा फसव्या अॅप्स आणि प्रकरणांची माहिती संबंधित तपास यंत्रणांनाही कळविण्यास सांगण्यात आले आहे.
अनधिकृत मोबाइल अॅप्सद्वारे ग्राहकांच्या दस्तऐवजांचा तसेच त्यांच्या मोबाइलवर माहितीचा प्रसंगी गैरवापर होण्याचा संभव असल्याचे मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे. कर्जदारांवर वाजवीपेक्षा जास्त व्याजाचा दर आणि अनेक छुप्या शुल्कांची वसुलीदेखील त्यांच्याकडून केली जाते. कर्जवसुलीसाठीही अप्रशस्त आणि दांडगाईच्या मार्गाचा वापर केला जातो, अशाही लोकांच्या तक्रारी आहेत. अशा फसगत झालेल्या लोकांना ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी रिझव्र्ह बँकेने तिच्या संकेतस्थळावर (https:achet.rbi.org.in) अशी विशेष खिडकीही खुली केली आहे.
शिवाय अशा कंपन्या दैनंदिन गरजांपासून व्यावसायिक गरजांपर्यंत विविध कर्जे देत असल्यामुळे त्यांचा माग काढणे अवघड जाते. ज्याला कर्ज दिले आहे, त्याच्या आडनावावरून किंवा त्याच्या मोबाइल क्रमांकावरून कोणकोणते क्रमांक वारंवार डायल केले जातात ते पाहून त्या सर्वांना या कर्जासाठी तुम्ही जामीन आहात, असे सांगितले जाते. या सर्वांमागे घेतलेले कर्ज फेडण्याविषयी सतत कॉल केले जातात. त्यासाठी अत्यंत असभ्य व अर्वाच्च भाषा वापरली जाते. अशा कंपन्या देत असलेली कर्जे ही असुरक्षित कर्जे असतात, याकडेही त्या सीएने लक्ष वेधले.