कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बाँबस्फोट घडविण्याची चाचणी घेतल्याचे उघडकीस आले आहे.
कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बाँबस्फोट घडविण्याची चाचणी घेतल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतचा अहवाल राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केला आहे.
महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री अटक केली. त्यांचा म्होरक्या महंमद शहनवाज आलम (वय ३१) पसार झाला आहे. खान आणि साकी यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (२५ जुलै) संपली. दोघांना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांनी दोघांच्या पोलीस कोठडीत पाच ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.
साकी आणि खान ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबधित असून, ते जयपूर येथे बाँबस्फोट घडविण्याच्या तयारीत होते. स्फोटके बाळगल्याप्रकरणी एनआयएने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ते पसार झाले होते. दीड वर्षांपासून ते कोंढव्यात वास्तव्यास होते. कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात दुचाकी चोरताना दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये जंगलात बाँबस्फोटाची चाचणी घेतल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.
खान आणि साकी कोंढव्यातील मीठानगर भागात गेल्या दीड वर्षांपासून वास्तव्य करत होते. पोलिसांच्या पथकाने त्यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा घरात ड्रोन कॅमेऱ्याचे साहित्य, पांढऱ्या रंगाची पावडर, पिस्तूलाचे चामडी पाकीट, एक काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पांढऱ्या रंगाची पावडर नेमकी कशासाठी वापरली जाते, याचा तपास करण्यासाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठीव पाठविण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल अद्याप मिळालेला नाही, असे एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे.
पुण्यात बाँबस्फोटाचा कट
दहशतवादी इम्रान खान, युनूस साकी दुचाकी चोरताना पकडले गेल्याने बाँबस्फोटाचा कट उधळला गेला. दुचाकीत स्फोटके ठेवून स्फोट घडविण्याचा कट दोघांनी रचल्याचे उघडकीस आले आहे. दोघांचा पुण्यात कोठे वावर होता, याची माहिती घेण्यात येत असून, त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्यांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.