११ ऑक्टोबर, २०२३ रोजी बॉलीवूडचा शहनशाह आणि सर्वेसर्वा अमिताभ बच्चन यांचा ८१ वा वाढदिवस आहे. आजही अमिताभ बच्चन यांची एनर्जी ही तरूणांना हैराण करणारी आहे. अनेक तास काम करूनही अत्यंत उत्तम तब्बेत आणि एनर्जी नेहमीच अमिताभ बच्चन कसे सांभाळू शकतात याबाबत अनेकांना उत्सुकता असते.
‘KBC’ च्या सेटवर आजही अमिताभ बच्चन सर्वाधिक उत्साहात दिसतात. बिग बी नेहमीच अत्यंत अनुशासित आणि उत्तम आयुष्य जगत आले आहेत आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात कशा पद्धतीने ते जगतात हे जाणून घ्यायची अनेकांना उत्सुकता असते. अमिताभ बच्चन यांचे फिटनेस रूटीन कसे आहे जाणून घेऊया..
एका मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन रोज सकाळी लवकर उठतात आणि नियमित वर्कआऊट करतात. याशिवाय सकाळी न चुकता जिममध्ये जातात आणि २० मिनिट्स किमान चालण्याचा व्यायाम करतात. ब्लड सर्क्युलेशन उत्तम राहावे यासाठी कधीही चुकवत नाही. यामुळेच दिवसभर एनर्जी उत्तम राहाते.
एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी स्वतः स्पष्ट केल्यानुसार, ९ तास झोप पूर्ण केल्यानंतरच ते उठतात. तसंच रात्र लवकर झोपण्याची त्यांना सवय आहे. यामुळेच त्यांचे आरोग्य अधिक चांगले राखले जाते. तसंच आपल्या एका ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला होता की, नियमित प्राणायम आणि काही ब्रिदिंग एक्सरसाईज न चुकता ते करतात.