Saturday, March 22, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा समाजाकडून नाकाबंदी, रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित…

मराठा समाजाकडून नाकाबंदी, रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित…

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत असल्याने राज्यातील अनेक तालुक्यातील शेकडो गावांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आपली युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाने चहुकडून केलेल्या घेरेबंदीनंतर रोहित पवार यांनी बॅकफूटवर येऊन यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यात्रा स्थगित केली नाहीतर मराठा समाज त्यांची यात्रा बंद पाडेन, अशी धमकीच मराठा आंदोलक योगेश केदार यांनी दिली होती. तसेच इतरही आंदोलकांनी रोहित पवार यांना यात्रा बंद करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन यात्रा स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार यांनी घेतलाय.

आमदार संदीप क्षीरसागर, रोहित आर.आर. पाटील, जयदेव गायकवाड व राज्यातील विविध जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात सध्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शांतता धोक्यात येऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे आले, पण त्यांनी मराठा आरक्षणावर एक शब्द काढला नाही. मनोज जरांगेंची प्रकृती ढासळत चालली आहे. ते प्रामाणिकपणे समाजासाठी लढत आहेत. राज्य सरकार मराठा, धनगर समाजाच्या बाबतीत संवेदनशील नाही. आम्ही ही यात्रा युवा हितासाठी काढली.

गावबंदीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवता आहात का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, गावबंदीच्या निर्णयावर हा निर्णय घेतला नाही, आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. या यात्रेदरम्यान एका गावात मी स्वतः सर्वांना भेटलो, तेव्हा आम्ही मराठा आरक्षणावर ठाम असल्याचे सांगितले. तेव्हा सर्वजण आमच्याबरोबर काही अंतर चालले. मी गावबंदीमुळे अजिबात स्थगिती केली नाही, तर ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली, ते युवा अस्वस्थ असताना ही यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही. राज्यातील युवक आज आत्महत्या करत असतील आणि राज्यातील वातावरण अस्वस्थ असेल आणि त्या राज्यसभा संवेदनशील असेल, तर अशा परिस्थितीत यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments