Tuesday, October 13, 2026
Homeआरोग्यविषयकविसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट भोवला; दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल

विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट भोवला; दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल

8 डीजे स्पीकर, 2 मिक्सर, 2 ॲम्प्लीफायर आणि वाहन पोलिसांकडून जप्त

पिंपरी-चिंचवड : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी शिरगाव-परंदवडी पोलिसांनी दोन गणेश मंडळांवर कारवाई केली. या कारवाईत डीजे साऊंड सिस्टिमसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले.

20 सप्टेंबर रोजी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक पार पडली. या दिवशी एकूण 38 सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण करणाऱ्या दोन मंडळांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले.

चांदखेड येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि ओझर्डे येथील शिवतेज मित्र मंडळ यांच्याविरोधात संबंधित कायद्यांनुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी कारवाई करत 8 डीजे साऊंड सिस्टिम स्पीकर, 2 डीजे मिक्सर, 2 ॲम्प्लीफायर आणि 1 वाहन जप्त केले.

गणेशोत्सवाच्या काळात 9 सप्टेंबर ते 26 सप्टेंबरदरम्यान सार्वजनिक ठिकाणी उच्च आवाज क्षमतेच्या डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टिम आणि ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साधनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच डीजे चालक-मालक यांना यापूर्वीच नियमांची माहिती देण्यात आली होती.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कोणतीही पूर्वसूचना न देता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच संबंधित डीजे-डॉल्बी साऊंड सिस्टिम जप्त केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान डीजे न वाजविण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सर्व गणेश मंडळांना करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments