महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. पिंपरीतून कमळाच्या चिन्हावर आमदार निवडून आणण्याचा निर्धार भाजपने केला असून, त्यासाठी विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांची पिंपरीच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. संपर्क ते समर्थन अभियानाअंतर्गत पाच हजार घरी संवाद प्रवास करून सरल उपयोजनवर नोंदणीची जबाबदारी खापरे यांच्यावर सोपविली आहे. भाजपने लक्ष घातल्याने आमदार अण्णा बनसोडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अश्विनी जगताप आणि महेश लांडगे तिथे आमदार आहेत. तर, पिंपरीत अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. पिंपरी मतदारसंघाच्या निर्मितीपासून भाजपला निवडणूक जिंकता आली नाही. त्याचे शल्य भाजपला आहे. २००९ मध्ये अमर साबळे यांचा पराभव झाला. २०१४ मध्ये मित्र पक्ष आरपीआय आणि २०१९ मध्ये युतीमध्ये शिवसेनेला जागा सुटली. त्यामुळे दोन्हीवेळेस लढता आले नाही. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
महायुतीच्या या त्रिकोणात विद्यमान आमदार असलेल्या पक्षांना जागा सुटतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मावळ लोकसभा मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तसेच चिंचवड, भोसरी भाजपला सुटेल, असे सांगितले जात होते. मात्र, पिंपरीत महायुतीतील मित्र पक्षाचे आमदार असतानाही भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. पिंपरीतून कमळावर आमदार निवडून आणण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. बावनकुळे यांनी पिंपरी मतदारसंघात निर्णायक ठरणाऱ्या पिंपरी बाजारपेठेत रॅली काढून व्यापाऱ्यांशी संवाद साधला. भाजपने लक्ष घातल्याने आमदार बनसोडे यांच्या समोरील अडचणी वाढू शकतात.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘महाविजय २०२४’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पक्षाने आपली रणनीती आखली आहे. विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ मतदारसंघांवर लक्ष ठेवले जाणार आहे. या माध्यमातून मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहेत. -उमा खापरे, आमदार