पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी शिवबंधन बांधले.
भाजपच्या प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा दिलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी सभागृह नेते एकनाथ पवार हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. आज (दि.२५) मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन आहिर, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्याचा पवार यांनी नुकताच राजीनामा दिला होता. एकनाथ पवार हे पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी एकदा भाजपाच्या उमेदवारीवर भोसरी विधानसभेची निवडणुकही लढविली होती. त्याचबरोबर पक्षाचे सभागृह नेते म्हणुन त्यांनी पक्षासाठी चांगली जबाबदारी पार पाडली होती. पक्षातील ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांचे ते निकटवर्ती आहेत. त्याच बरोबर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांचेशी त्यांचे चांगले संबंध आहेत. स्मृती ईराणी यांच्या अमेठी लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्यावेळी त्यांनी तेथे जावून महत्वपूर्ण कामगीरी पार पाडली होती.
दरम्यान, एकनाथ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तसेच, एकनाथ पवार हे लोहा कंधार विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणुक लढवू ईच्छीत आहेत. या या मतदार संघात शिवसेनेची चांगली ताकद असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.