चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला जेरीस आणल्याचे चित्र असताना आता मोठा धक्का दिला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी गुरूवारी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे चिंचवड मतदारसंघात भाजपची ताकद आणखी वाढली असून, किवळे-रावेत या भागात भाजपला मताधिक्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेखर ओव्हाळ यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आदी उपस्थित होते.
शेखर ओव्हाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. तसेच ते पिंपरी विधानसभा मतदारसंघातूनही इच्छुक होते. ते पक्षात नाराज होते. त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत होता. त्यामुळे त्यांनी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गुरूवारी प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे रावेत-किवळे भागात भाजपची ताकद वाढली आहे. या भागातून भाजपला मताधिक्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.