कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा मोठा फटका बसला असताना चिंचवडमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळालं आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे निवडणूक पार पडली. शिवाय, उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी झाल्यामुळे ही तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये अश्विनी जगताप यांचा ३५ हजारांहून जास्त मतांनी मोठा विजय झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला आहे. अश्विनी जगताप यांचा ३६,०९१ मतांनी मोठा विजय झाला. त्यांना ३७ व्या फेरीनंतर एकूण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाले. दुसरीकडे महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मतं मिळाली.
“मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे”, अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी विजयानंत दिली आहे.
राहुल कलाटेंची बंडखोरी
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधून निवडणूक लढण्यासाठी राहुल कलाटे इच्छुक होते. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर अजित पवार, सचिन अहिर अशा नेतेमंडळींनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही राहुल कलाटे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले.
आज झालेल्या मतमोजणीमध्ये पिंपरी-चिंचवडकरांनी अश्विनी जगताप यांच्या पारड्यात आपला कौल दिल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि राहुल कलाटेंना मिळालेल्या मतांचं गणित मांडून हा विजय मविआचा असू शकला असता, असा दावा केला जात आहे. राहुल कलाटे आणि नाना काटे यांना मिळालेल्या मतांची बेरीज ही अश्विनी जगताप यांच्याकडे असलेल्या मतांच्या आघाडीपेक्षा जास्त असल्यामुळे जर कलाटेंनी बंडखोरी केली नसती, तर चिंचवडमध्येही भाजपाला धक्का देण्यात मविआला यश आलं असतं, असा तर्क मांडला जात आहे.