भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळालं. त्यानंतर वेगाने घडामोडी सुरु झाल्या आणि अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली.
राज ठाकरेंनी फेटाळली भाजपाची विनंती
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत, भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती करीत भाजपाची कोंडी केली होती. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं.
शरद पवार आणि प्रताप सरनाईक यांनीही केलं होतं आवाहन
अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या ऋुतुजा लटके आणि भाजपाचे मुरजी पटेल यांच्यात लढत होणार होती. लोकप्रतिनिधींचे निधन झाले व त्यांच्या कुटुंबातील कोणी पोटनिवडणूक लढवीत असल्यास शक्यतो निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा असल्याचे सांगत पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडली होती. दुसरीकडे ‘बाळासाहेबांची शिवसेने’चे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं होतं.