३ डिसेंबर २०२०,
महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा मतमोजणीला निकाल लागला असून भाजपनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तब्बल २३४ मतांनी पराभव झाला आहे.
धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना ३३२ मते मिळाली आहेत. तर, पटेल यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघ्या ९८ मतांवर समाधानं मानावं लागलं आहे. चार मते बाद झाली आहेत. या निवडणुकीत एकूण ४३७ मतदारांपैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. तीन पदवीधर, दोन शिक्षक व एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. त्यापैकी धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल लागला आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली व काही वेळातच विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली.