राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर एक गंभीर आरोप केला आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप मृत्युशी झुंज देत असल्यापासूनच भाजपने चिंचवडच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली होती. शेळके यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
चिंचवड विधानसभेच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सोमवारी पहिलीच बैठक दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या बालेकिल्ल्यात पार पडली. राष्ट्रवादीने सुनील शेळकेंवर चिंचवड विधानसभेची जबाबदारी टाकली असल्याने ते ही या बैठकीला हजर होते. या बैठकीनंतर सुनील शेळकेंनी हा गंभीर आरोप केलाय. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे निधन 3 जानेवारीला झाले. मात्र भाजपने प्रत्यक्षात तीन महिने आधापासूनच चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली होती. मग त्यांनाच संवेदनशीलता नसेल तर मग ही निवडणूक आम्ही बिनविरोध का करावी? असा प्रश्नही शेळकेंनी यावेळी उपस्थित केला.
पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपने आवाहन केले आहे. परंतु या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहिणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर उत्तर आणि पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची उदाहरणे देत पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.