२ जानेवारी २०२०,
भाजपा मधील खदखद आता समोर येत असून, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी स्वत:चं राजकारण सरळ व्हावं म्हणून माझं राजकारण संपवण्याचा डाव आखला आहे. त्यामुळेच मला विधानसभेचं तिकीट नाकारतानाच माझ्या मुलीचाही पराभव घडवून आणला गेला, असा थेट आणि खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी पहिल्यांदाच थेट नाव घेऊन आरोप केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
एका वृत्तवाहिनीशी खास मुलाखत देताना एकनाथ खडसे यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट देण्यास तीव्र विरोध केला होता. पक्षश्रेष्ठी मला तिकीट देण्यास अनुकूल असतानाही फडणवीस आणि महाजन यांनी त्याला विरोध केला. कोअर कमिटीतील माझ्या मित्र आणि वरिष्ठांनीच मला ही माहिती दिली. स्वत:चं राजकारण सरळ आणि सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी माझं तिकीट कापलं. माझं राजकारण संपवण्याचा हा डाव आहे, असा आरोप करतानाच तिकीट न देण्यामागे काय प्रयोजन आहे? असं मी पक्षश्रेष्ठींना वारंवार विचारलं. माझा गुन्हा काय? मी काय बदमाशी केली? असंही मी पक्षश्रेष्ठींना विचारलं. पण मला त्याचं उत्तर देण्यात आलं नाही, असं खडसे म्हणाले . माझ्याबाबत ही जाणीवपूर्वक खेळी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.