मोदी सरकारमुळे देशातील लोकशाही बिकट अवस्थेत असल्याचे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. मोदी सरकारने देशातील लोकशाही, अर्थव्यवस्था आणि सीमेबाबत गंभीर तडजोडी केल्या आहेत, असे म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.
त्यांनी शनिवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, वृत्तसंस्था, न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय व्यवस्था हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये याबाबत अनेक तडजोडी झाल्या आहेत. सध्याच्या घडीला प्रसारमाध्यमं आणि न्यायव्यवस्थेच्या बाबतीत जगात भारताचा बराच खालचा क्रमांक लागतो. देशातील आर्थिक विषमता आणि बेरोजगारीनेही उच्चांक गाठल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
तसेच पैशाचे मूल्य सातत्याने घसरत आहे. पेट्रोल-डिझेलवरील कर वाढत आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर भारत दुबळा पडत आहे. मोदी सरकारने या सगळ्याबाबत तडजोड केली आहे. यापैकी अनेक गोष्टी काँग्रेसच्या राजवटीचा परिपाक असला तरी ही परिस्थिती बदलण्यासाठी फार कमी प्रयत्न झाल्याची टिप्पणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.