भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गिरीश बापट यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
“ते एका फायटरप्रमाणे लढले”
आजचा दिवस अत्यंत वाईट आहे. अत्यंत दु:खद अशी घटना आज घडली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट आज आपल्यामध्ये राहिले नाहीत. त्यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय. गेल्या दीड वर्षांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते, आजाराशी झुंजत होते. ते अत्यंत झुंजार असे व्यक्तिमत्व होते. एका फायटरप्रमाणे ते लढले. पण आज त्यांची झुंज थांबलीये, अशी प्रतिक्रिया जगदीश मुळीक यांनी दिली.
कसबा पोटनिवडणुकीसाठी प्रचारात दिसले होते गिरीश बापट…
गिरीश बापट गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी झुंजत होते. त्यांच्यावर उपचारही चालू होते. मात्र, तरीदेखील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत गिरीश बापट एका मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती. इतके आजारी असूनही भाजपानं बापट यांना प्रचारात उतरवल्याचं टीकास्र विरोधकांनी सोडलं होतं.
याच दरम्यान, गिरीश बापट रुग्णालयातून थेट भाजपाच्या एका जनसंपर्क कार्यालयात दाखल झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. गिरीश बापट पुन्हा एकदा राजकारणात पूर्वीप्रमाणेच सक्रीय होणार, अशी चर्चा या घटनेनंतर सुरू झाली होती.