भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांचे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे सुरू असून काल ते पिंपरी चिंचवड येथे आले होते. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आज सोमय्या यांनी येथे पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करत त्याचा कागदोपत्री तपशील मांडला व ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. यादरम्यान सोमय्या यांना शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागले.
किरीट सोमय्या हे पिंपरी चिंचवडमध्ये आल्याची माहिती मिळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड येथील भाजप कार्यालयावर धडक दिली. कार्यालयासमोर येऊन सोमय्यांना काळे झेंडे दाखवले आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी काही शिवसैनिकांनी कार्यालयाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आले आणि इमारतीचे गेट लॉक करण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला भाजप कार्यकर्त्यांनीही गर्दी करत शिवसेनेला विरोध केला. दोन्ही बाजूकडून होणाऱ्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
किरीट सोमय्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर पडले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र संघर्ष वाढण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी त्यांना रोखले. गर्दी पांगवत पोलिसांनी सोमय्या यांना वाट करून दिली व सोमय्या तिथून दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघाले. यादरम्यान शिवसैनिकांच्या निषेधाच्या घोषणा सुरूच होत्या.
किरीट सोमय्या यांनी आज जालना सहकारी साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप पुन्हा एकदा केला. या कारखान्याचे खोतकर परिवार तसेच मुळ्ये परिवार असे दोन मालक असून त्यात रुपाली विश्वास नांगरे पाटील या एक भागधारक असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. या कारखान्यातील घोटाळा लक्षात घेता नांगरे पाटील यांना पोलीस दलाच्या सेवेतून मुक्त केले पाहिजे, अशी मागणीच सोमय्या यांनी केली. जालना साखर कारखान्याची चौकशी बंद करण्यावर आक्षेप घेत याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हायला हवी किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली.