भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २०, गुजरातमधील ७, दिल्लीतील २, हरियाणातील ६, हिमाचल प्रदेशमधील २, कर्नाटकमधील २०, मध्य प्रदेशमधील ५, तेलंगणामधील ६, उत्तराखंडमधील २, दादर आणि नगर हवेलीतील १ आणि त्रिपूरामधील १ उमेदवार जाहीर केले आहेत.
याआधी पक्षाने १ मार्च रोजी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली होती ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहासह अनेक प्रमुख स्टार उमेदवारांचा समावेश होता. आता दुसऱ्या यादीत पक्षाने ७२ उमेदवारांची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे.
दुसऱ्या यादीत मनोहर लाल खट्टर यांना करनाल येथून उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीतील ७ पैकी ५ उमेदवारांची घोषणा पहिल्या यादीत करण्यात आली होती. आता दुसऱ्या यादी उर्वरीत २ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. पूर्वी दिल्लीतून हर्ष मल्होत्रा, तर उत्तर पश्चिम दिल्लीतून योगेंद्र चंदोलिया यांना संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील उमेदवार
नागपूर- नितीन गडकरी
पुणे- मुरलीधर मोहोळ
माढा- रणजीतसिंह निंबाळकर
जळगाव- स्मिता वाघ
सांगली – संजय काका पाटील
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
नगर- सुजय विखे-पाटील
जालना- रावसाहेब दानवे
अकोला- अनुप धोत्रे
भिवंडी- कपिल पाटील
उत्तर मुंबई- पियुष गोयल
बीड- पंकजा मुंडे
लातूर-सुधार श्रृंगारे
नंदुरबार- हिना गावीत
रावेर- रक्षा खडसे
धुळे- सुभाष भामरे
वर्धा- रामदास तडस
नांदेड- प्रतापराव चिखलिकर
डिंडोरी-भारती पवार
उत्तर मुंबई- मिहर कोटेचा
उमेदवारी देताना काही जुन्या खासदारांना वगळले
बीडमधून प्रीतम मुंडे, जळगावातील उन्मेष पाटील, मुंबईतून गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आणि अकोल्यातून संजय धोत्रे यांना डच्चू देण्यात आला आहे. भाजपनं बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे, जळगावातील उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ, गोपाळ शेट्टी यांच्या मुंबई उत्तर मतदारसंघात पियूष गोयल, मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक यांच्या मतदारसंघात मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अकोल्यात संजय धोत्रे यांना प्रकृतीच्या कारणामुळं संधी नाकारण्यात आली आहे. त्या ठिकाणी अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारली मात्र त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे यांना प्रकृतीच्या कारणामुळं उमेदवारी नाकारण्यात आली असून त्या ठिकाणी अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार बदलला होता. ए टी नाना पाटील यांच्या जागी उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर मुंबईत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर, मनोज कोटक यांना डच्चू देत मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


