पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात आली असून, पक्षाची पहिली उमेदवारी यादी येत्या रविवारी (दि. २८) जाहीर होणार आहे, अशी माहिती भाजपचे पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी (दि. २६) दिली.
आमदार जगताप यांनी सांगितले की, पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई येथे बैठक पार पडली असून, या बैठकीला पक्षाच्या कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकीमध्ये विधानसभानिहाय उमेदवारांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारी निश्चित आहे, त्या नावांना प्राथमिक मान्यता देण्यात आली असली तरी अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींचाच असणार आहे. त्यानुसार प्रदेश आणि कोअर कमिटी उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.
उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी पक्षश्रेष्ठी घेतील, असा विश्वासही आमदार जगताप यांनी व्यक्त केला. “कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष मोठा होत असतो. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्ष न्याय देईलच,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाचा आदेश आल्यानंतर सर्वजण एकदिलाने आणि एकविचाराने काम करतील. आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा कमळ फुलविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.


