नाशिकशहरात होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अवघा दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेनात आता मानापमान नाट्याचा अंक सुरू झाला असून, त्यावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. भाजप नेत्यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी संमेलनावर बहिष्कार घातला आहे. केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार यांना साधे निमंत्रणही देण्यात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आमच्या नेत्यांची नावे मुद्दाम वगळ्याचा आरोप त्यांनी केला असून, ग्रंथदिंडी व्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावणार नसल्याचे म्हटले आहे.
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. समारोप शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः मंत्री छगन भुजबळ आहेत. शिवाय संमेलनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे हजेरी लावणार आहेत. त्यामुळे आधीच हे संमेलन राजकीय झाल्याचा आरोप होत आहे. साहित्य महामंडळाने राजकीय व्यक्तींना साहित्य संमेलनात प्राधान्य द्यायचे नाही, हे यापूर्वीच ठरवले आहे. त्यासाठी उस्मानाबादचे साहित्य संमेलनाकडे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून पाहता येईल. येथे स्वतः सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख प्रेक्षकांमध्ये बसले होते. मात्र, नाशिकच्या समंलेनाचे उद्घाटन ते समारोपाचा नारळ राजकीय व्यक्तीच फोडणार आहेत.
नाशिक शहरात होणारे साहित्य संमेलन याआधी एचपीटी महाविद्यालच्या मैदानावर होणार होते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संमेलन पुढे ढकलण्यात आले होते. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर हे साहित्य संमलेन एचपीटी ऐवजी भुजबळ नॉलेज सीटी येथे हलविण्यात आले. त्यातच संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ आहेत. संमेलनाचे निमंत्रण देताना भाजपच्या नेत्यांना डावलण्यात आल्याची ओरड भाजपकडून केली जात आहे. तसेच हे साहित्य संमेलन राष्ट्रवादीने हायजॅक केले आहे का, असाही सवाल काही भाजपनं केला आहे.
नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे मी नाराज झालो आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील विविध नेत्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत असून त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र भाजपच्या नेत्यांना डावलण्यात आल्याचे दिसत आहे. फक्त आमच्या पक्षालाच टार्गेट करण्यात आल्याचे दिसत आहे. – महापौर सतीश कुलकर्णी