मुंबई | पावसाळी अधिवेशन २०२५च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेतील एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली असून, भारतीय जनता पक्षाचे अभ्यासू आणि नव-चर्चित आमदार श्री. अमित गोरखे यांची तालिका सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीची अधिकृत घोषणा विधानपरिषदेचे सभापती मा. राम शिंदे यांनी सभागृहात केली.
या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले, “मा. सभापती राम शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि जबाबदारीची बाब आहे. तालिका सभापतीपद ही केवळ एक जबाबदारी नसून, विधानपरिषदेच्या कार्यवाहीतील शिस्त, प्रक्रियात्मक पारदर्शकता आणि संयमाचे प्रतीक आहे. हे पद मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पार पाडेल.”
गोरखे पुढे म्हणाले, “नवनिर्वाचित आमदार म्हणून सभागृहात पदार्पण करताच मला हे पद लाभणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतो.”
विशेषत: त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहणारे मा. ना. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. “त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज या जबाबदारीच्या ठिकाणी पोहोचलो आहे. त्यांच्या विश्वासास मी नक्कीच पात्र ठरवीन,” असे गोरखे म्हणाले.
अमित गोरखे हे त्यांची ठाम वक्तृत्वशैली, मुद्देसूद अभ्यास, आणि जनतेशी असलेली थेट नाळ यासाठी परिचित आहेत. त्यांच्या या निवडीमुळे विधानपरिषदेत भाजपच्या युवा नेतृत्वाला नवे बळ मिळाले आहे. या निर्णयामुळे सभागृहात एक सकारात्मक आणि ऊर्जावान वातावरण निर्माण होईल, असा विश्वास अनेक राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.