पुण्यातल्या हाय प्रोफाइल पबवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. परवाना देताना पोलिसांनी घालून दिलेल्या अटीचे उल्लंघन केल्या प्रकरणी २३ पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. रूफ टॉप बार हाय प्रोफाइल पबची मागील महिन्याभरात पथकांच्या माध्यमातून झाडाझडती करून घेऊन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
शहरात हॉटेल, पब, बार, परमिट रूमची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना रात्री दीडपर्यंत परवानगी दिली जाते. मात्र, यानंतरही रात्री उशीरापर्यंत नियमभंग करत बार सुरू ठेवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या महिन्यातच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरात तपासणी मोहीम राबवत रात्री उशीरापर्यंत सुरू राहणाऱ्या बड्या हॉटेल, पबवर कारवाई केली होती. यानंतर आता आलिशान अशा ‘रुफ टॉप’बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
शहरात उंच अशा व्यावसायिक इमारतींवर अलिशान पद्धतीने ‘रुफ टॉप’ बार चालविले जातात. त्यांना परवाना देताना नियम घालून देण्यात आलेले असतात. याअंतर्गतच मंजूर नकाशा व्यतिरीक्त अन्य ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र, अनेकजण हे परवाना कक्षाच्या बाहेर व्यवसाय करत असल्याचे तपासात समोर आले आहे. अशाप्रकारे परवाना कक्षाबाहेर अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या शहरातील २३ ‘रूफ टॉप’ बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
संबंधीत अस्थापनांना नोटीसा देण्यात आल्या असून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये हॉटेल कलेक्टीव्हीटी, कल्याणीनगरमधील हॉटेल नारंग व्हेन्चर्स, विमाननगरमधील अरोरा हॉस्पिटॅलीटी, कोंढव्यातील एस.आर.एन हॉस्पिटॅलीटी, टू व्हिलेज, महंमदवाडीतील पंजाबी बाय नेचर, वाल्हेकर हॉस्पिटॅलीटी, हॉटेल यूअर हायनेस, हॉटेल झिंग, खराडीतील हॉटेल टू डॉट्स, कोका, कोथरूडमधील हॉटेल न्यूट्रीप्रीझम हॉस्पिटॅलीटी आदींचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभाग पुणेचे अधिक्षक चरणसिंह रजपूत, उप अधिक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याचे चरणसिह रजपूत यांनी सांगितले.