Thursday, January 16, 2025
Homeताजी बातमीमोठी बातमी ! महायुतीची आजची बैठक रद्द; एकनाथ शिंदे साताऱ्यातील गावी निघाले..

मोठी बातमी ! महायुतीची आजची बैठक रद्द; एकनाथ शिंदे साताऱ्यातील गावी निघाले..

महायुतीला स्पष्ट आणि प्रचंड बहुमत मिळूनही मुख्यमंत्री आणि खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? हे ठरविण्यासाठी चार दिवसांचा कालावधी गेल्यानंतर आता खातेवाटपावरून नाराजी दिसून येत आहे. शिवसेनेने (शिंदे) गृह खात्यावर दावा केला आहे. तर भाजपाकडून या दाव्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान काल (दि. २८ नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्याची बातमी समोर येत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार एकनाथ शिंदे हे साताऱ्यासाठी निघाल्यामुळे महायुतीची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.

अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर महायुतीचे नेते, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुंबईत परतले होते. त्यानंतर आज मुंबईत खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींवर सोपविल्यानंतर शिवसेनेकडून (शिंदे) गृहमंत्री पदावर दावा केला जात आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट हे उघडपणे गृहखाते एकनाथ शिंदेंकडे द्यावे, ते कायदा व सुव्यवस्था राखण्यास सक्षम व्यक्ती आहेत, असे सांगत आहेत.

दिल्लीतील बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी सूचक व्यक्तव्य केले होते. अमित शाह यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक बैठक झाल्याचे त्यांनी म्हटले. “मुंबईत भाजपाची बैठक होईल. त्यानंतर पुढील निर्णय होईल. दिल्लीतली आमची बैठक सकारात्मक झाली. अमित शाह, जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. माझी भूमिका मी जाहीर केली आहे. मी शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. डेडलॉक संपला आहे. सगळे काही व्यवस्थित आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतो आहे” असे एकनाथ शिंदेंनी म्हटले होते.

आज मुंबईत बैठक होईल, अशी माहिती खुद्द एकनाथ शिंदे यांनीच दिली होती, त्यानंतरही ते सातारा येथे जाणार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments