मध्यरात्री दरड कोसळल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका आदिवासी पाड्यावर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये १२० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या वाडीतील ९० टक्के घरे ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे.
आता पुन्हा भूस्खलन होत असून अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत.
दुर्घटना झाल्यानंतर काही लोक घाबरून जंगलात पळाले आहेत. ते परतल्यानंतरच वाडीतील नक्की किती जण या दरडीखाली अडकलेले असू शकतात, याबाबतची नेमकी माहिती मिळेल, असं आपत्कालीन बचाव पथकाच्या एका सदस्याने सांगितलं आहे.
दरम्यान, राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल झाले आहेत. पहाटेच मंत्री दादाजी भुसे यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. मात्र सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे त्यांना वरपर्यंत जाता आलं नाही. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत.