आज दुपारी अहमदाबादहून लंडन गॅटविककडे जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI171 (Boeing 787-8 Dreamliner) या प्रवासी विमानाचा टेक-ऑफनंतर काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. हे विमान दुपारी 1:38 वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत होते, मात्र काही वेळातच मेघानीनगर परिसरात कोसळले.
विमानात एकूण २४२ प्रवासी व कर्मचारी होते. यामध्ये:
• १६९ भारतीय नागरिक
• ५३ ब्रिटिश नागरिक
• ७ पोर्तुगीज नागरिक
• १ कॅनेडियन नागरिक
एअर इंडिया आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व २४२ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर परिसरात मोठी आग लागली, धुराचे प्रचंड लोट पसरले, आणि काही भागात विमानाचे अवशेष घरांवर कोसळल्याने स्थानिक नागरिकांच्याही जीविताला धोका निर्माण झाला. एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव कार्यासाठी फायर ब्रिगेड, पोलीस, आणि एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत तात्काळ मदतीचे आदेश दिले आहेत.
एअर इंडियाने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन नंबर जारी केला आहे – 1800-5691-444
कंपनीने सांगितले की, DGCA आणि अन्य तपास यंत्रणांसोबत सहकार्य करण्यात येत आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवली जात आहे.
ही दुर्घटना एअर इंडियाच्या Boeing 787-8 Dreamliner इतिहासातील पहिला मोठा अपघात ठरला आहे.