महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा प्रस्तावित परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. नार्वेकर हे दक्षिण आफ्रिकेतील घाना येथे होणाऱ्या ६६ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत सहभागी होणार होते. परंतु, आता अचानक त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा रद्द करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, असं म्हटलं जात आहे की, शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर नार्वेकर यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत आफ्रिकेतील घाना देशाचा दौरा करणार होते. एकीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेची सुनावणी प्रलंबित आहे. असं असताना नार्वेकर घानाला जाणार असल्याने विरोधकांनी टीका सुरू केली होती. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने विधीमंडळातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त प्रसिद्ध केलं आहे की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या आठवड्याचा सुरुवातीला हा परदेश दौरा रद्द केला होता. म्हणजेच ठाकरे गटाने टीका करण्याआधीच त्यांच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लंडन-जर्मनी दौरा रद्द करण्यात आला आहे. ठाकरे गट सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाल्यामुळेच हे दौरे रद्द होत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटमुळे मुख्यमंत्र्यांचा लंडन-जर्मनी दौरा रद्द झाला तर ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रामुळे विधानसभा अध्यक्षांचा घाना दौरा रद्द झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे.
आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी घेण्यास विधानसभा अध्यक्ष जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांच्या कारभारावर ताशेरे ओढले. परिणामी विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा आता रद्द करण्यात आला आहे.