सर्वसामान्यांचा आधार असलेले ससून सर्वोपचार रुग्णालय अमली पदार्थांच्या तस्करीचा अड्डा बनणे, ही बाब पुणेकरांसाठी धक्कादायक आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन तत्काळ कठोर कारवाई करायला हवी होती. अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचे पलायनही धक्कादायक आणि संतापजनक आहे. महायुती सरकारमधील एका मंत्र्याशी त्याचे संबंध उघड होत आहेत. ससूनमधील वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या चौकशा समित्या नेमण्याचा फार्स करण्याऐवजी ससूनमधील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अशी मागणीही जोशी यांनी केली आहे.
चौकशी समिती हा फार्स – धंगेकर
ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत आरोग्य विभागातीलच समकक्ष अधिकारी नेमल्याने या समितीवर कसबा पेठ विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करावी, अशी मागणी धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
अंमली पदार्थ तस्करीतील आरोपी ललित पाटीलने पलायन केल्यानंतर ससून रूग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला. देशभरात या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. यात अनेक मोठे मासे गुंतले असून ही समिती हा केवळ चौकशीचा फार्स आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. आरोग्य विभागाची समिती डॉक्टरांना वाचविण्याचा प्रयत्न करील, त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांनीच ही चौकशी करावी, असे धंगेकर यांनी मुखमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे