Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीनवीन संसद भवन ‘सेंट्रल व्हिस्टा’चा पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा

नवीन संसद भवन ‘सेंट्रल व्हिस्टा’चा पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा

१० डिसेंबर २०२०,
नवीन संसद भवनाची निर्मिती ही नव्या व जुन्याच्या सहअस्तित्वाचे उदाहरण आहे. आज १३० कोटींपेक्षा जास्त भारतीयांसाठी अत्यंत सौभाग्याचा व गर्वाचा दिवस आहे. आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरत आहोत. काळ आणि गरजेच्या अनुषंगाने स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न आहे. नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यानंतर बोलताना म्हटलं. ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी आज(गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.

याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या सध्याच्या संसद भवनाने स्वातंत्र्याचे आंदोलन व नंतर स्वतंत्र भारताला घडण्यासाठी आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारची निर्मिती देखील इथेच झाली व पहिली संसद देखील इथंच बसली. याच संसद भवनात आपल्या राज्यघटनेची रचना झाली. आपल्या लोकशाहीची पुर्नस्थापना झाली. संसदेची सध्याची इमारत स्वतंत्र भारताचे प्रत्येक चढ-उतार, आपली प्रत्येक आव्हानं, आपल्या आशा-आकांक्षा, समाधान, आपल्या यशाचे प्रतीक राहिलेली आहे. या इमारतीत बनलेला प्रत्येक कायदा, या कायद्याच्या निर्मिती दरम्यान झालेल्या अनेक गंभीर चर्चा, हे सर्व आपल्या लोकशाहीचा ठेवा आहे. मात्र संसदेच्या शक्तीशाली इतिहासाबरोबरच यथार्थ स्वीकारणे तेवढंच आवश्यक आहे. ही इमारत आता जवळजवळ १०० वर्षांची होत आहे. मागील दशकात तत्कालीन गरजांना लक्षात घेता सातत्याने यामध्ये बदल केले गेले. या प्रक्रियेत अनेकदा भिंती तोडण्यात आल्या आहेत, अन्य सुविधांमध्ये बदल केले गेले. सदस्यांना बसण्यास पुरेसी जागा मिळावी यासाठी भिंती देखील हटवल्या गेल्या आहेत. एवढं सर्व झाल्यानंतर हे संसद भवन आता विश्रांती मागत आहे.”

तसेच, “आता लोकसभा अध्यक्ष देखील सांगत होते, की कशाप्रकारे अनेक वर्षांपासून अडचणींची परिस्थिती राहिलेली आहे. अनेक वर्षांपासून नव्या संसद भवनाची गरज जाणवलेली आहे. अशावेळी हे आपल्या सर्वांचे दायित्व ठरते की २१ व्या शतकातील भारताला आता एक नवे संसद भवन मिळावे. याच दिशेने आज हा नवा शुभारंभ होत आहे.” असं देखील मोदी म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती होती. नवीन संसद भवनासाठी ९७१ कोटींच्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे.‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’कडे नवीन संसद भवनाच्या उभारणीचं कंत्राट देण्यात आले आहे. नवीन संसद भवनाची इमारत चार मजली असणार आहे.

नवे संसद भवन उभारण्याच्या ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत कोणतेही नवे बांधकाम आणि प्रकल्पस्थळी कोणतीही तोडफोड करण्यात येणार नाही, अशी हमी दिल्यानंतर १० डिसेंबरच्या नियोजित कोनशिला समारंभास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला परवानगी दिली होती.

त्यानंतर आज मंत्रोच्चारासह विधीवतरित्या हा भूमिपूजन सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या उभारणीसाठी पूजा करण्यात आली. या भूमिपूजन सोहळ्यासाठी मान्यवरांसह सर्व धर्मांच्या गुरूंची देखील उपस्थिती होती. भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींनी नियोजित नवीन संसद भवनाच्या कोनशिलेचे अनावरण केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments