काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करतात. कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही, हे निलेशने सिध्द करून दाखविले आहे. कधीही परिस्थितीचा बाऊ न करता, येईल त्या परिस्थितीला सामोरे जात, लग्न कार्यात वेटरची नोकरी करत ध्येयाकडे वाटचाल करत निलेशने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.
निलेश बचुटे यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील गवंडी कामगार आहेत. दहा बाय दहा च्या झोपडीत नीलेश हा आई-वडीलांसह सात लोकांसोबत राहत आहे. पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठरा विश्वं दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, वडिल गवंडी, त्याच्यावरच कुटुंबाची गुजराण, मात्र नुसती पोटाची आग विझली म्हणजे संसार होत नाही, पोरांना शिकवणं, त्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खरे पालकत्व. ती जबाबदारी ओळखून वडिलांनी गवंडी काम करत चार पैसे गाठीला बांधून नीलेशला चांगलं शिक्षण दिले आणि त्याचे चीज करीत अखेर नीलेशनेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या ४ जुलैच्या निकालात उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आणि गवंड्याच्या पोराने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश पाहून सर्व नातेवाईक गहिवरून गेले.
निलेश हा लहानपणापासूनच हुशार असल्याने आईवडिलांची त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. नीलेश याच्या शिक्षणासाठी त्याचे आई-वडिलांनी अपार कष्ट केले आहे. अभ्यासाची आवड असलेल्या नीलेश यास निगडी येथील ओझर्डे रॅडिकल इंस्टीट्यूटचे संचालक प्रा.भूषण ओझर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. नीलेशने शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले आहे. बीकॉम व एमकॉम रामकृष्ण महाविद्यालयातून झाले आहे. घरात दोन वेळ खायची वाणवा, असे दिवस काढलेल्या नीलेशने मोठ्या जिद्दीने पदव्युत्तर शिक्षण तर पूर्ण केलेच; मात्र अनेक छोटी-मोठी कामे करत अभ्यास करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यश मिळविले आहे.
एकाग्र मन व ठाम निर्णय घेण्याची क्षमता, आत्मविश्वासाच्या बळावर, जिद्द व चिकाटीने त्याने आपले शिक्षण व्यवस्थित पार पाडले आहे. अनेकवेळा कॉलेजमध्ये त्यांना पैशाची चणचण भासत असे. आई-वडिलांकडून सतत पैसे मागणे हे त्याला पटत नव्हते. त्यामुळे तो लग्नामध्ये वेटरची कामे करत असत. आईवडील कसे कबाडकष्ट करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत याची पूर्णपणे जाणीव नीलेशला होती.
“प्रामाणिकपणे कष्ट केल्यास या जगात अशक्य असे काहीच नाही’ हे नीलेशला चांगलेच समजले होते. त्यामुळे त्यांने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. कारण की, मनात कुठेतरी त्याला खाकी वर्दीबद्दल खास आकर्षण होते. अखेर त्यांची आज पोलिस उपनिरीक्षक या पदी निवड झाली. शिक्षण घेत असताना पाहिलेले स्वप्न व आईवडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज आज अखेरीस पूर्ण झाले आहे. लहानपणापासून दहा बाय दहा च्या झोपडीत अभ्यास करणाऱ्या नीलेश ने कष्टाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलाने मिळवलेले हे यश व संघर्षमय प्रवास असणाऱ्या नीलेश बचुटे याचा आदर्श इतर युवकांनी घेतला पाहिजे, असे निलेशचे मार्गदर्शक प्रा.भूषण ओझर्डे यांनी संगितले.