पुणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका भोंदूबाबाच्या विकृत कारनाम्यांमुळे खळबळ उडाली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार या भोंदूबाबाने आपल्या मठात येणाऱ्या भक्तांवर हायटेक पद्धतीने नजर ठेवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बावधन पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रसाद तामदार हा सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असून, त्याचे इंस्टाग्रामवर तब्बल दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्याच्या सोशल मीडियावरून महिलांबरोबर नाचतानाचे, मठात बोलताना आणि अश्लील प्रकार करतानाचे अनेक व्हिडीओ सापडले आहेत. विशेष म्हणजे, पोलिस तपासात तो समलैंगिक असल्याचेही उघड झाले आहे.
प्रसाद बाबा आपल्या भक्तांकडून त्यांचे मोबाईल फोन घेऊन ‘ग्रहदोष दूर करण्यासाठी’ कंपास अॅप डाऊनलोड करण्याचे सांगायचा. मात्र, त्या निमित्ताने ‘AirDroid Kid’ नावाचे एक गुप्त अॅप डाउनलोड करून भक्तांच्या मोबाईलवर पूर्ण नियंत्रण मिळवत असे. या अॅपच्या मदतीने त्याला मोबाईल कॅमेऱ्यातून थेट त्या व्यक्तीचे खासगी क्षण बघता यायचे. त्यामुळे अनेक भक्त त्याच्यावर अंधविश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात अडकत होते.
अधीक धक्कादायक बाब म्हणजे, प्रसाद बाबा मठात येणाऱ्या तरुण भक्तांना दोन दिवस फक्त तीन तास झोप घेण्याचा सल्ला द्यायचा. त्यानंतर त्यांना संपूर्ण कपडे काढून फक्त शाल घेऊन झोपायला लावायचा. भक्त झोपल्यानंतर तो त्यांच्या शरीराशी चाळे करायचा. हे सर्व करत असताना, ‘तुझ्या सगळ्या समस्या मी काढतोय’ असे सांगून भक्तांवर मानसिक दबाव आणून त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवत असे.
प्रसाद बाबा आणि त्याचे वडील भीमराव दातीर यांनी काही वर्षांपूर्वी ‘दिव्य साक्षात्कार’ असल्याचा दावा करत मठ सुरू केला होता. प्रसादने 2022 पासून स्वतःला बाबा म्हणून घोषित केलं होतं. मात्र, आता पोलिस तपासात त्याच्या खऱ्या हेतूचा आणि विकृत मनोवृत्तीचा पर्दाफाश झाला आहे.
पोलिसांनी पीडित भक्तांना पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, प्रसाद बाबावर आणखी गंभीर आरोप उघड होण्याची शक्यता आहे.