वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आदेश
३० डिसेंबर,
भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल मंगळवारी (दि. 31) रात्री अकरा ते बुधवारी (दि. 1) रात्री बारा पर्यंत राहणार आहे. याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी आदेश दिले आहेत. एक जानेवारी 2020 रोजी दरवर्षी प्रमाणे भीमा कोरेगाव येथे शौर्यदिनाचे मोठ्या स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून सुमारे 12 लाख लोक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात वाहुतक कोंडी होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. दिघी-आळंदी, चाकण, देहूरोड-तळेगाव वाहतूक विभागात करण्यात आलेले बदल पुढील प्रमाणे आहेत.
चाकण-शिक्रापूर रोडने शिक्रापूरकडे जातील,
चाकण पिंपरी चिंचवडकडून आळंदी मार्गे नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक मरकळ पासून पुढे लोणीकंदकडे न जाता कोयाळी शेलपिंपळगाव मार्गे चाकण-शिक्रापूर रोडने शिक्रापूरकडे जातील. सोलापूर बाजूला जाणारी जड वाहने आळंदी च-होली फाटा येथून दिघी मार्गे विश्रांतवाडी, येरवडा, खराडी बायपास, हडपसर मार्गे इच्छितस्थळी जातील. शिक्रापूरकडून येणारी मोठी वाहने ही तळेगाव-चाकण चौक येथून इच्छितस्थळी जातील.नाशिककडून येणारी मोठी वाहने ही शिक्रापूरकडे न जाता तळेगाव-चाकण चौकातून इच्छितस्थळी जातील. देहूरोड येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून येणारी वाहतूक सेंट्रल चौकातून निगडी पिंपरी-चिंचवडकडे न जाता सेंट्रल चौकातून कात्रजच्या दिशेने वाकड नाका, राधा चौकातून इच्छितस्थळी जातील.
मुंबईकडून पुण्याकडे वाहने अशी जातील,
मुंबईकडून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी वाहने वडगाव फाटा, सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक, कात्रज रोडने सरळ वाकड नाका, वराधा चौक येथून इच्छितस्थळी जातील. द्रुतगती मार्गावरून मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहने उर्से टोल नाका येथून कात्रजच्या दिशेने निगडी, मुकाई चौकाकडे न जाता सरळ वाकड नाका व राधा चौक येथून इच्छितस्थळी जातील. द्रुतगती मार्गावरून मुंबईकडून खिंडीतून तळेगावकडे येणारी वाहने वडगाव फाट्याकडे न जाता उर्से टोल नाका येथून सोमाटणेकडे जाणार्या बाह्यवळण मार्गाने इच्छितस्थळी जातील. नाशिक व तळेगावकडून येणारी वाहतूक तळेगाव-चाकण चौकातून शिक्रापूरकडे न जाता आळंदी फाटा येथून आळंदी मार्गे इच्छितस्थळी जातील.
पुणे-अहमदनगर मार्ग,
पुणे-अहमदनगर मार्गावरील पेरणे फाटा येथे गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पुणे शहरातून व पिंपरी-चिंचवड शहराकडून नगररोड वरून अहमदनगरकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांनी नगररोडवरील खराडी बायपास चौक येथून उजवीकडे वळून हडपसर-सोलापूर रोड-केडगाव-चौफुला मार्गे न्हावरा शिरुर नगररोडवरून अहमदनगरकडे जावे. किंवा येरवडा-विश्रांतवाडी-आळंदी-मरकळ मार्गे शेल पिंपळगाव-शिक्रापूर-नगररोडला जावे. सासवड, कात्रज बायपास रोडकडून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांनी हडपसर गाडीतळ पुलाखालून उजवीकडे वळून सोलापूर रोडने मांजरी फाटा-15 नंबर लक्ष्मी कॉलनी चौक पुणे येथून व सातारा रोडवरून येणा-या वाहनांना हडपसर येथून सोलापूर महामार्गावरून चौफुला मार्गे न्हावरा शिरूर नगररोडवरून अहमदनगरकडे वळवण्यात आली आहे.