राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षास मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने अनुभवी आणि विश्वासार्ह नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यास सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासह महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी आता भोईर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ नगरसेवक निवडून आले असले तरी भाजपचे ८४ नगरसेवक निवडून आल्याने सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप महापालिकेत आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत विरोधी बाकावरून जनहिताचे प्रश्न ताकदीने मांडण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची आवश्यकता होती. त्यासाठीच प्रशासनाची सखोल जाण, अभ्यासू स्वभाव आणि ठाम भूमिका असलेले भाऊसाहेब भोईर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगण्यात आले.
भाऊसाहेब भोईर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात सक्रिय असून, त्यांनी आतापर्यंत पाच वेळा नगरसेवक म्हणून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. विकासकामांचा अनुभव, महापालिकेतील कारभाराची बारकाईने जाण आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भोईर यांनी सांगितले की, “अजित पवार साहेबांनी पक्षासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांची मशाल पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे. महापालिकेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करू.”
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, भोईर यांच्या अनुभवाचा लाभ पक्ष संघटन आणि महापालिकेतील राजकारणात निश्चितच होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


