Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमीपुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फटका बसण्याची शक्यता …

पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फटका बसण्याची शक्यता …

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आल्याने आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे शहरातील राजकीय गणिते बदलणार असून, आगामी महापालिका निवडणुका भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढविल्यास भाजपच्या वाट्याच्या कमी जागा मिळणार आहेत. त्यामुळे भाजपचे महापालिकेत एकहाती सत्ता स्थापनेचे स्वप्नही धूसर होण्याची शक्यता आहे.

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शहरातील सर्व आठही विधानसभा मतदारसंघांत विजय मिळविला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१७ मधील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला तब्बल ९८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपची महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकहाती सत्ता आली होती. आगामी निवडणुकीत भाजपने ११० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही तशी जाहीर घोषणा केली होती. त्या दृष्टीने रणनीती आखण्यास भाजपकडून सुरुवात झाली आहे. मात्र, अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे या रणनीतीला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

आगामी सर्व निवडणुका शिंदे गट आणि भाजप एकत्र लढविणार असल्याचे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) बरोबर युती आहे. शिंदे गट आणि रिपाइंबरोबरच्या युतीमुळे भाजपच्या काही जागा कमी होण्याची शक्यता यापूर्वीच स्पष्ट झाली आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणूक अजित पवार यांना एकत्र घेऊन लढविल्यास भाजपच्या वाट्याला आणखी कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष होता. राष्ट्रवादी काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. ही निवडणूक या तिन्ही पक्षांनी एकत्रित लढल्यास किमान ५० हून अधिक जागांवरील हक्क भाजपला सोडावा लागणार आहे. भाजपच्या अनेक नगरसेवकांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता असल्याने या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच शहरात अजित पवार यांच्या समर्थकांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये तीन ते चार वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नगरसेवकांनाही काही जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे एकहाती सत्ताप्राप्तीचे भाजपचे स्वप्न धूसर ठरण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments