Monday, October 7, 2024
Homeताजी बातमीबेगम परवीन सुलताना यांच्या कर्णमधुर आणि सुरांची पखरण करणा-या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

बेगम परवीन सुलताना यांच्या कर्णमधुर आणि सुरांची पखरण करणा-या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

२४ जानेवारी २०२०,
पिंपरी – पिंपरी चिंचवड नगरीच्या सांस्कृतिक वैभवाचा मुकुटमणी मानला जाणा-या स्वरसागर महोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या हस्ते गुरुवारी(२३ जानेवारी) झाले. प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात बेगम परवीन सुलताना यांना यंदाचा सतरावा स्वरसागर पुरस्कार उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, विख्यात गायक महेश काळे, सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे, येस बँकेचे प्रवीण पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. स्वरसागर महोत्सवाचे मुख्य प्रायोजक फरांदे स्पेसेस हे आहेत.

पुरस्कार प्रदान समारंभानंतर बेगम परवीन सुलताना यांचे अत्यंत कर्णमधुर आणि सुरांची पखरण करणारे गायन झाले. त्यांनी आपल्या गायनाची सुरवात राग ‘पूरियाधनाश्री’ मधील विलंबित बंदिशीने केली. ‘लागी मोरी लगन’ असे शब्द असलेली ही बंदिश त्यांनी पतियाळा गायकीची सर्व मर्म उलगडून दाखवत सादर केली. त्यांची सुरांवर असलेली पकड त्यांच्या गायनातून दिसत होती. त्यानंतर ‘पायलिया झनकार मोरी’ ही द्रुत लयीतील बंदिश त्यांनी सादर केली. मिश्र पहाडी रागातील अत्यंत लडिवाळ अशी ‘कौन गली गयो शाम’ ही ठुमरी सादर करुन त्यांनी रसिकांना सुरांच्या वर्षावात भिजवून टाकले. त्यानंतर खास रसिकाग्रहास्तव ‘रसिका तुझ्याचसाठी’ हे मराठी गीत सादर केले. या गीताच्या विविध आठवणी जागवत असताना पुण्यातील सवाई महोत्सवात वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षी पहिल्यांदाच गायन सादर करताना भारतरत्न भीमसेन जोशी यांनी हे गीत खास त्यांच्या पद्धतीने कसे शिकवले याच्या आठवणी जाग्या केल्या. परवीनजींनी आपल्या गायनाच्या सांगता ‘भवानी दयानी महावाकवानी’ या मिश्रभैरवीतील त्यांच्या अत्यंत आवडत्या भजनाने केली.

यावेळी परवीनजींना संवादिनी अत्यंत समर्पक अशी साथ पंडित श्रीनिवास आचार्य यांनी केली. तसेच दमदार तबलाासाथ पंडित मुकुंदराज देव यांनी केली. तानपु-याची साथ सचिन शेटे व स्मिता देशमुख यांनी केली. येथील रसिकांबद्दल गौरवोद्गार काढून परवीनजींनी विशेष कौतुक व्यक्त केले. तसेच उत्तम ध्वनीसंयोजनाबद्दल देखील पसंतीची दाद दिली. शरयूनगर मित्रमंडळ, प्राधिकरण यांचे या महोत्सवाला सहकार्य लाभले आहे.

पुरस्कार समारंभाआधी संदीप ऊबाळे, योगिता गोडबोले आणि सुवर्णा राठोड – कुलकर्णी यांनी मराठी सुगम संगीत सादर केले. त्यांनी सादर केलेल्या नव्या, जुन्या मराठी गाण्यांच्या हिंदोळ्यावर उपस्थित रसिक मनसोक्त विहरले. या कार्यक्रमाची सुरुवात संदीप याने ‘गणनायकाय गणदैवताय’ या गणेशस्तवनाने केली. त्यानंतर त्याने ‘पाहिले न मी तुला, कधी तू रिमझिम झरणारी बरसात’ अशी सोलो व योगिता गोडबोले यांच्या साथीने ‘जीव रंगला, दंगला’ हा अत्यंत लोकप्रिय गीत सादर केले. यावेळी योगिता गोडबोले यांनी ‘चांदण्यात फिरताना, गो-या गो-या गालावरी चढली लाजेची लाली’ अशी एकापेक्षा एक श्रवणीय गीते सादर केली. सुवर्णा राठोड – कुलकर्णी या मूळच्या कन्नड गायिकेने ‘अधीर मन झाले, जाळीमंदी पिकली करवंद’ ही सदाबहार लावणी ठसक्यात सादर केली. संदीप याने सादर केलेल्या छत्रपती संभाजी या मालिकेच्या टायटल सॉंगने या मैफिलीची सांगता झाली. या श्रवणीय कार्यक्रमाचे तितकेच लक्षवेधी निवेदन स्नेहल दामले यांनी केले. या सर्व कलाकारांना कीबोर्डची साथ केदार परांजपे आणि दर्शना नांदूरकर यांनी केली. तबला साथ विक्रम भट व रिदम मशीनची साथ अजय अत्रे यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments